Ad will apear here
Next
‘दो जिस्म मगर एक जान है हम...’
संगीतकार जयकिशनभारतीय संगीताच्या इतिहासात शंकर-जयकिशन या जोडीचे नाव अजरामर आहे. या जोडीने बॉलीवूडला एकाहून एक हिट गाणी दिली. १२ सप्टेंबर हा जयकिशन यांचा स्मृतिदिन! त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या, ‘दो जिस्म मगर एक जान है हम...’ या गीताबद्दल...
...................................
‘दो जिस्म मगर एक जान है हम...’. कधी काळी गीतकार शैलेंद्रने ही एक ओळ लिहून ठेवली होती. गाण्याचा मुखडा म्हणतात त्याला. ‘घरौंदा’च्या निर्मितीत व्यस्त असलेला राज कथानकाच्या अनुषंगाने समर्पक गीते शोधत होता. काही त्याने लिहूनही घेतली. पती आणि पत्नी यांच्यामधील समज-गैरसमज, एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या पती पत्नीच्या जीवनात संशयांची एखादी ठिणगीही केवढा वणवा पेटवू शकते, त्याची दृश्ये, संवाद, पटकथा सारेच राजने तयार केले. या संशयी दिवसात दोघांचे मनोभाव व्यक्त करणारे एखादे गीत असेल तर...? गीत अर्थपूर्ण हवे. कथानकाला पोषक हवे, असे त्याला वाटून गेले.

‘दो जिस्म मगर एक जान है हम’ हा मुखडा त्याने एकदा ऐकला होता. एकमेकांवर निस्सीम प्रेम करणारे पती-पत्नी असेच जगत असतात नाही का? घरौंदाची नायिका राधा व नायक सुंदर असेच आहेत. त्यांच्यासाठी एकंदर प्रसंगानुरूप गीत हवे असेल, तर त्याचा मुख्य आशय या ओळीत सामावला असल्याचे राजला जाणवले. वास्ताविक माणसाची दोन मते असतात. अमुक एक गोष्ट कर असे एक मन सांगते, तर ती करू नको असे दुसरे मन सांगते. त्या संदर्भात शैलेंद्रने लिहलेली ती ओळ. राजच्या सूचनेवरून हसरतच्या सहाय्याने त्यातून एक वेगळेच सुंदर गीत जन्मले. त्यानंतर ‘घरौंदा’ या नावाने होत असलेला तो चित्रपट नाव बदलून ‘संगम’ झाला. पडद्यावर आला आणि आर. के. च्या परंपरेप्रमाणे हीर गाण्यांची बरसात करून गेला.

संगीत अर्थातच शंकर-जयकिशनचे. शैलेंद्रच्या त्या रचनेप्रमाणे असणारे ‘दो जिस्म मगर एक जान है हम’ असणारे शंकर-जयकिशन, हिंदी चित्रपटसृष्टीत आपला एक ठसा उमटवणारे शंकर-जयकिशन, वैविध्यपूर्ण संगीत, आकर्षक चाली, सुरेल संगीताचे सातत्य असणारे शंकर-जयकिशन, कलाकृतीने व वैभवाने संपन्न असणारे शंकर-जयकिशन..!

शंकर-जयकिशनवैभवालाही एका शापाला सामोरे जावे लागते. यशाचाही मत्सर केला जातो आणि या मत्सरघाताचेही परिणाम भोगावे लागतात असे म्हणतात. म्हणूनच हे भूलोकीचे यक्ष-किन्नर अखेरच्या काळात विभक्त झाले आणि १२ सप्टेंबर १९७२ रोजी काळानेही ‘ती’ जोडी फोडली. जयकिशनचे त्या दिवशी निधन झाले. आज ४८ वर्षे झाली. त्याची आठवण म्हणून हे लेखन..? छे! छे! विस्मृतीत गेले आहेत त्यांची याद जागवायची असते. हर घडी ज्यांचे संगीत आजही ऐकावेसे वाटते, त्यांची गाणी ऐकल्याशिवाय एकही दिवस जात नाही ते शंकर-जयकिशन विस्मृतीत जातीलच कसे? उलट ते सर्वत्र भरून राहिल्याचेच दिसते. तरीही १२ सप्टेंबर जयकिशनच्या गमनाची जखम ताजी करतो.

दक्षिण गुजरातमधील बासंदा गावात जयकिशन यांचे बालपण गेले. जयकिशन डाह्याभाई पांचाल हे त्यांचे पूर्ण नाव. बालपणी त्यांना ‘बटुक’ असे म्हणत. त्यांचे वडिल संगीताचे जाण असणारे होते. जयकिशन यांचा मोठा भाऊ बलवंत उत्तमरीत्या हार्मोनियम वाजवत असे. घरातील आर्थिक ओढाताणीमुळे बलवंत, जयकिशन व त्यांचे दोन-तीन मित्र गावोगावी पेटी वाजवत, गाणे म्हणुन पैसे मिळवत असत. पुढे जयकिशनने श्रीप्रताप सिल्व्हर ज्युबिली गायन शाळेतून संगीताचे शिक्षण घेतले. प्रेमशंकर नायक यांनी पुढील काळात त्यांना मार्गदर्शन केले.

जयकिशन यांची मोठी बहीण ‘मणिबेन’ यांनी गायलेल्या एका गाण्याच्या चालीवरून ‘नई देहल्ली’ चित्रपटातील ‘मुरली बैरन भई रे कन्हैय्या’ या गाण्याची चाल बांधली. ज्या ‘बासंदा’ गावातील गायन शाळेत जयकिशन शिकले, त्या शाळेला त्यांनी आर्थिक मदत केली. त्यामुळे तेथील लोकांनी त्या शाळेचे ‘जयकिशन संगीत निकेतन’ असे नामकरण केले.

‘बेगुनाह’ नावाच्या चित्रपटात जयकिशन यांनी पडद्यावर एक गीत गायले होते. ‘श्री ४२०’ चित्रपटातही ते आपल्याला पडद्यावर दिसतात. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी जशी सुंदर होती तसे ते ही दिसायला सुंदर होते. जयकिशनबद्दलच्या अशा अनेक स्मृती, अनेक विचार मनात पिंगा घालू लागतात. ‘संगम’मधील लता-मुकेश यांनी गायलेले गीत आठवते. त्याची पार्श्वभूमी चाहत्यांना ज्ञात आहे. निर्मितीचा इतिहासही सांगितलाच आहे. एक गीत कशाप्रकारे जन्मते व कशा प्रकारे उपयोगी ठरते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गीत आहे. शंकर-जयकिशन यांचा विचार करता या गीतातील ‘दो जिस्म मगर...’ ही ओळ या दोघांसाठीच लिहिली गेली नव्हती ना? हा प्रश्न पडतो.

याच गीतातील एका कडव्याच्या अखेरीस मुकेश गातो, ‘आखिर हमने क्या देख लिया, क्या बात है, क्यू हैरान है हम..’ या ओळीचा अर्थ व अखेरच्या काळातील शंकर जयकिशन यांचे विभक्त होणे, एकेकट्याने संगीत देणे. जयनंतर शंकरची झालेली ससेहोलपट, सारेच अनाकलनीय प्रश्नासारखे न सुटणारे.! त्यांनीच संगीतात गुंफलेल्या ओळी त्यांच्या चाहत्यांच्या ओठी ‘आखिर हमने क्या देख लिया’ असा प्रश्न ठेवून जातात. नियतीची अजब करामत.

१२ सप्टेंबरच्या निमित्तानं हेच सुनहरं गीत. सतारीचा सुंदर वापर, लतादीदींचे आलाप, समर्पक चाल व संगीतात बसवलेले शब्द...

लता : ‘ओ मेरे सनम, ओ मेरे सनम, दो जिस्म मगर एक जान है हम, इक दिलके दो अरमान है हम...’

हे प्रिया, दोन शरीरे पण एक जीव असणारे असे आपण दोघे आहोत. एकाच हृदयाच्या दोन आकांक्षा आहोत. (आणि मग असे असताना तुझ्या मनात शंका कसली आहे?)

लता : ‘तन सौंप दिया, मन सौंप दिया कुछ और तो मेरे पास नही जो तुमसे है मेरे हमदम, भगवानसे भी वो आस नही. जिस दिन से हुए एक दुजेके, इस दुनियासे अंजान है हम..’ 

तुला मी माझे शरीरच नव्हे तर मनही अर्पण केले. आता माझ्याजवळ काही राहिले नाही. तुझ्याबद्दल मला जी ओढ आहे, ती ओढ प्रत्यक्ष परमेश्वराबद्दलही नाही. ज्या दिवशी आपण एकमेकांचे झालो, तेव्हापासून हे जग मला अनोळखी झाले आहे (मी त्याकडे दुर्लक्ष करत आहे). (आणि असे असतानाही तू माझ्याकडे संशयाने बघावेस?)

मुकेश : ‘सुनते है प्यार की दुनियामें दो दिल मुश्कीलसे समाते है.. क्या गैर वहाँ अपनो तक के साये भी न आने पाते है.. हमने आखिर क्या देख लिया, क्या बात है, क्यू हैरान है हम’ 

प्रेमाच्या दुनियेत दोन हृदये, मने मोठ्या मुश्कीलीने राहतात (म्हणजे ती दोन मने दोन नसतात एकच झालेली असतात.). असे असते, तेव्हा त्यांच्याजवळ, त्यांच्या विश्वात कोणी परकी व्यक्तीच काय पण त्या परक्या व्यक्तीची सावलीही येऊ शकत नाही, असे आम्ही ऐकून होतो. (आणि असे आपल्या दोघांच्या बाबतीत असताना) आम्ही शेवटी हे काय पहात आहोत? काय अशी गोष्ट आहे की त्यामुळे आम्ही हैराण झालो आहोत.

आपल्या पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीची मन:स्थिती व्यक्त करताना शैलेंद्रने किती समर्षक शब्दात हे काव्य गुंफले आहे बघा. आपला पती आपल्यावर संशय घेतो आणि हैराण होतो, हे त्याचे मनोगत ऐकल्यावर त्यावर उत्तर देताना ती पत्नी पुढच्या कडव्यात म्हणते - 

‘मेरे अपने, अपना ये मिलन, संगम है ये गंगा-जमुना का जो सच है सामने आया है, जो बीत गया एक सपना था.. ये धरती है इन्सानोंकी, कुछ और नही इन्सान है हम’

अरे माझ्या प्राणप्रिया आपले हे मिलन गंगा जमुना नदींच्या संगमासारखे पवित्र आहे (हे तू विसरू नकोस). जे काय सत्य होते ते पुढे आले आहे (तू ते अनुभवले आहेस आणि), जे घडुन गेले ते स्वप्न होते (मी ते विसरून गेले आहे) (अरे) ही पृथ्वी, हे जग माणसांचे आहे आणि आपणही माणसं आहोत अन्य कोणी नाही. (मानवाच्याच हातून चुका घडतात देवांच्या हातून नाही आणि मी ही मानव आहे हे लक्षात घेऊन तू मला समजून घे.)

पती-पत्नींची ही मनोगते, सूचक शब्द, योग्य उपमा आणि यासाठी सुरेल चाल व संगीत. लता दिदींचा स्वर, मुकेश यांच्या स्वरातील संभ्रमावस्था आणि त्याच वेळी पडद्यावर राजकपूर आणि वैजयंतीमाला यांचा लाजवाब अभिनय, हे सारं खऱ्या अर्थाने या गाण्याला सुनहरे गीत बनवणारं आहे. 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZTIBG
 Very good, informative and interesting.
Prapurika Joshi Hi Jodi sangit kshetrat ajaramar hoti ...
Prapurika Joshi Sangam...hya ganysla kiti surekh shabdaat vistrut varnan kele aahe.....
Similar Posts
आ नीले गगन तले... गीतकार हसरत जयपुरी यांचा आज (१७ सप्टेंबर) स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘आ नीले गगन तले’ हे गीत...
मोहब्बत में पहला कदम रखनेवालो... नृत्यकुशल अभिनेत्री वैजयंतीमाला यांना आज, १३ ऑगस्ट २०२० रोजी ८४ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांच्यावर चित्रित झालेले ‘मोहब्बत में पहला कदम रखनेवालो...’ हे एक वेगळे गाणे...
‘तुम तो दिल के तार छेडकर...’ हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याच्या आवाजातील गाण्यांचा एक स्वतंत्र चाहतावर्ग आजही आहे, असा गायक कलावंत म्हणजे तलत मेहमूद. नऊ मे हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या तलत मेहमूद यांच्या आवाजातील ‘तुम तो दिल के तार छेडकर...’ या गीताचा...
सब कुछ सीखा हमने... शोमॅन राज कपूर आणि संवेदनशील गीतकार शैलेंद्र हे दोघे खास मित्र. १४ डिसेंबर हा राज कपूर यांचा जन्मदिन, तर शैलेंद्र यांचा मृत्युदिन, हा एक विचित्र योगायोगच. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या शैलेंद्र यांनी राज कपूर यांच्या ‘अनाडी’ चित्रपटासाठी लिहिलेल्या या सुंदर गीताचा... सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language